Panchgani

 


Lockdown नावाच्या लांबलचक प्रकरणामुळे कंटाळलेलो होतो आणि सहज कुठेतरी भटकून येऊ म्हणुन पाचगणीत येऊन धडकलो होतो. बरं ज्या घरात राहणार होतो ते बूकिंग करताना साइटवर जसं दिसत होतं तसं नव्हतंच. जूनचा पाऊसही इतका होता की बाहेर जायची सोय नव्हती. शिवाय आम्ही सगळेजण वर्किंग होतो. Wifi च्या नावाखाली घरमालकाने जिओचं portable router हातावर टिकवलं होतं. आणि त्याला खिडकीच्या एका कोपर्‍यात एका विशिष्ट अँगलमधूनच रेंज येत असे. बाकी घरात रेंजच्या नावाने बोंब होती. घर ऐसपैस होतं पण पावसाने घराच्या भिंतीनाच नव्हे तर जमिनीला सुद्धा ओल धरली आहे हे घरात पाया टकल्या क्षणी लक्षात आलं. पैसे भरले होते त्यामुळे दुसरीकडे जायची सोय नव्हती. रेंज साठी अजून दोनेक ठिकाणी जाऊन आलो पण पूर्ण गावातच रेंज जेमतेमच होती आणि जे होईल त्याला सामोरं जाऊ म्हणुन नाईलाजाने का होईना आम्ही याच घरात पडीक राहिलो आणि ते चांगलंच झालं. 


सकाळी 10 च्या आत आणि संध्याकाळी 6 नंतर आजूबाजूला फिरून येणे आणि मधला दिवसभर काम करणे असं adjust करत करत केलेली ट्रीप. सुरुवातीला निर्जन आणि भुताटकी वाटणारं ते घर हळूहळू आमच्या वावरामुळे सवयीचं झालं इतकं की दिवसभर पावसाचा आवाज आणि अधूनमधून चालणारे चहा Coffee गप्पांचे फड बघून अजून आठवणीत आहेत. मुळात office timing restrictions, पाऊस आणि covid restrictions यामुळे आम्ही तिथं जेमतेमच फिरलो असू पण घरात (म्हणजे स्वतःच्या घराबाहेर) राहून निव्वळ पाऊस ऐकत काम करणं सुद्धा covid च्या एकसुरी कंटाळवाण्या काळात bliss होतं. 


एके दिवशी सकाळ- सकाळी पावसाने उघडीप दिल्याचं पाहून मी सहज आजूबाजूच्या गल्ल्या फिरून यायला निघाले. बाकी जनता झोपेत होती. मी निघाले हे बघून राणी (owner's pet dog) पण माझ्या मागून निघाली. ती माझ्या चालण्याचा अंदाज घेत कडेकडेनी फिरत चालली होती. 2 parallel गल्ल्या व्यवस्थित चाललो पण तिसर्‍या गल्लीत राणीला बघून तिकडच्या पाळीव कुत्र्याने तिला प्राणांतिक हाका मारायला सुरू केल्या. ते ऐकून अजून त्याचे नॉन पाळीव 2-3 जातभाई जमा झाले. परिस्थिती गांभीर होतेय हे लक्षात घेऊन सगळ्यात आधी राणीनं धूम ठोकली. उरले मी! निर्मनुष्य गल्ली. पळायचीदेखील सोय नाही. बाकीचे सुद्धा माझ्यामागे पळायला लागले तर काय करणार. मी आपला जीव मुठीत धरून हळू हळू त्या गल्लीतून चालत बाहेर आले आणि मग निवांत चालत घरी पोहोचले तर राणीसरकार पायरीशी निवांत लोळत पडल्या होत्या. 


प्रवासांनी आयुष्यात खूप आनंद दिले. तरी जितके शक्य होते त्या मानाने फार कमी प्रवास घडले. कधी वेळ नाही म्हणुन 

कधी पैसा नाही म्हणुन... पैसा हाती आला तेव्हाही उगाच आयुष्यात स्थैर्य वगैरेच्या मागे लागलो.आता लक्षात येतं की महिनाभर जितका घरखर्च लागतो तितक्याच खर्चात भारतात कुठेही राहणं शक्य आहे. होता होईल तितका देश पाहून झाला असता. असो. 


Comments

Popular Posts