नागरिकांचं बिघडलेलं शास्त्र

पत्रास कारण की - 
सर्वप्रथम हिंजवडीत office ला रोज जाणार्‍या लोकांना माझा शीर - साष्टांग नमस्कार. वि. वि. कारण की.. (वि. वि. म्हणजे काय हे कळण्या इतकं मराठी येत असेल तरच हे वाचण्यात अर्थ आहे. असो. ) तर... हिंजवडी चौकात जाण्यासाठी खड्डे विरहित किंवा समतल असलेला (म्हणजे even ground इंग्रजांनो)  रस्ता जर कुणी मला सांगितला तर मी त्या माणसाची महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्याच्या मूड मध्ये आहे. हेही नसेल होत तर कमीतकमी ज्या रस्त्यावरुन आपण ऑफिस ला जातो त्यावरून प्रवास करताना- " रस्ता बनवणारं सरकार" किंवा "ऑफिसला बोलवणारा बॉस" किंवा "सह -   प्रवास करणारे वाहनचालक" या तिघांपैकी कुणालाच शिव्या न देता तुम्ही जर हिंजवडीत ऑफिस ला जात असाल तर I'd like to meet you in person. मला ती निर्वाणावस्था प्राप्त करून घ्यायची आहे प्लीज. 

Let me remind you, हिंजवडी हे पुण्यातलं मुख्य IT Hub आहे. तिथं 1000 पेक्षा जास्त कंपन्या असून त्यात 10 लाखांपेक्षा जास्त लोक काम करतात असं गूगल सांगतं. रोज प्रवास करणारे लोक साधारण अडीच लाख लोक आहेत. हा आकडा फुगवलेला, covid पूर्वीचा आहे असं म्हणूया तरीही किमान 50 हजार ते एक लाख लोक आजही या रस्त्याने रोज वापरत असतील. आणि तिथे मुख्य चौकात पोहोचायचं असेल तर तुम्हाला वापरायला एकच लेन आहे. उजवी लेन मेट्रो च्या कामाने खाल्ली आहे आणि डाव्या लेन मध्ये paver blocks आहेत जे uneven आहेत. तिथे दर दिवसा आड एक तरी बाइक स्लिप होते अशी बातमी आहे! 

हिंजवडी मधून बाहेर पडायचा दुसरा रस्ता - लक्ष्मी चौक मार्गे भुमकर चौक - इंदिरा कॉलेज असा. तो इतका थोर आहे की 3 लेन च्या लांब रुंद रस्त्यावर रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पूर्ण पसरलेले खड्डे आहेत. खड्डा चुकवायचा म्हटला तर तुम्हाला डायरेक्ट रस्त्याच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत लेन बदलून बाइक न्यावी लागेल आणि असं zigzag चालत रहावं लागेल. गाडी त्यातल्या त्यात कोणत्या खड्ड्यात टाकायची हा एकमेव चॉईस तुमच्याकडे उरतो. त्यात माती आणि धूळ इतकी अफाट आहे की तुम्ही अक्षरशः भंडारा उधळल्या सारखे न्हाऊन निघाल त्यातून. 

त्यात लोकांचा ट्रॅफिक सेन्स आणि confidence इतका अफाट आहे की ज्याला तोड नाही. आज स्वतःचा लाल सिग्नल असताना, चालू ट्रॅफिक मध्ये स्वतःची बाइक टाकून समोरुन  जाणार्‍या व्यक्तीच्या बाईकला ठोकून वरतून अजून त्यालाच "डोळे फुटलेत का xxx दिसत नाहिये का तुला" वगैरे ऐकवणारा एक अति विद्वान सद्गृहस्थ आम्ही याची देही याची डोळा पहिला. पोलिसाने चौकात हात देऊन एका बाजूची ट्रॅफिक ब्लॉक केली असताना त्या पोलिसाच्या नाकावर टिच्चून त्याच्या समोर स्वतःची स्कूटर दामटण्यासाठी अख्ख्या ट्रॅफिक ला थांबायला भाग पाडणारा दुसरा विद्वान वेगळा. काय बिशाद आहे कुण्या पोलिसाने यांना अडवून दाखवायची. असे नग दरवेळी दिसत राहतात. 

आता एवढाच त्रास होतोय तर जा पाकिस्तानला वगैरे म्हणणारा एखादा विद्वान इथेही असेलच.. तर कुठे जायचे ते आम्ही पाहूच. पण त्या आधी तुम्हीही या सगळ्यातून जाताय का ते पहा. जनता म्हणुन आपलेही काही हक्क असतात याची जाणीव असू द्या. त्या चीडचीडीचं तुम्हाला काही करावंस वाटतं का ते बघा.  "मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही" या कॅटेगरी मधले तुम्ही असाल तर सोडून द्या. आणि हे सगळं माहित असूनही जर तुम्ही मुळीच चिडचिड न करता निमुटपणे हे स्विकारलं असेल तर मग तेही सांगा कारण मला तुमच्याकडे patience शिकायला यायचं आहे. खरंच! 

कळावे. लोभ असावा.
आपलीच. 

Comments

Popular Posts