Madam tussaud
र १७६१ लंडन येथे.
दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या मादाम तुसाँ यांचे पूर्वीचे नांव मेरी ग्रोशोल्ज असे होते.
मेणाचे मुखवटे आणि पुतळे तयार करण्याची कला त्यांनी डॉ.फिलिप कर्टियस यांच्याकडून शिकून घेतली. त्यांचे स्वतःचे कौशल्य आणि कल्पकता यांच्या जोरावर या कलेत त्या पारंगत झाल्या. अनेक तत्कालीन थोर व्यक्तींचे हुबेहूब मेणाचे पुतळे त्या दोघांनी मिळून बनवले आणि त्यांचे प्रदर्शन मांडले. त्या काळात सिनेमा व टेलिव्हिजन नसल्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींचे चेहेरे पाहण्याचे साधन नव्हते. ते कसे दिसतात याचे कुतुहल सर्वसाधारण लोकांच्या मनात असायचे, पण थोरामोठ्या लोकांशी प्रत्यक्ष संबंध येऊ शकत नसे. यामुळे या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहाला भेट देऊन ते आपली औत्सुक्याची तहान भागवून घेत असत.
मेरीच्या कौशल्याची कीर्ती फ्रान्सच्या राजवाड्यापर्यंत पोचली आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमा तयार करण्याचे काम तिला मिळाले. त्याच काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्यात ज्यांचा शिरच्छेद झाला होता अशा व्यक्तींच्या चेहे-यांचे मुखवटे बनवण्याचे काम तिला देण्यात आले. त्यासाठी मुडद्यांचे ढीग उपसून त्यातून ओळखीचे चेहेरे शोधून काढण्याचे भयानक काम तिला करावे लागले. राज्यक्रांतीनंतर सुरू झालेल्या अराजकाच्या काळात या दिव्यातून जात असतांना तिलाच अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. मेरीचाही गिलोटीनवर शिरच्छेद होणार होता. पण कोणा दयाळू माणसाच्या कृपेने ती कशीबशी तिथून निसटली.
तुसाद नांवाच्या गृहस्थाबरोबर विवाह करून तिने संसार थाटला. त्यानंतरही तिच्या अंतरीची कलेची ओढ तिला नवनव्या कलाकृती बनवण्याला उद्युक्त करत होती आणि डॉ.कर्टिस यांच्या निधनानंतर त्यांचे सारे भांडार तिच्या ताब्यात आले होते. फ्रान्समधील अस्थिर वातावरणापासून दूर ब्रिटनमध्ये जाऊन आपल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन करायचे तिने ठरवले. त्यासाठी ती तिथे गांवोगांव हिंडत होती.
एवढ्यात फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात युद्ध जुंपल्यामुळे तिचा परतीचा मार्ग बंद झाला. अखेरीस ती लंडनमध्येच स्थाईक झाली आणि तिथे तिने कायम स्वरूपाचे प्रदर्शन भरवले. हे प्रदर्शन इतके लोकप्रिय झाले की मादाम तुसादच्या निधनानंतरदेखील नवे कलाकार तिथे येत राहिले, मेणाच्या बाहुल्या बनवण्याचे तंत्र शिकून त्या प्रदर्शनात भर घालत राहिले.
मादाम तुसाँ हयात असतांनाच एकदा त्यांच्या कलाकृतीसकट त्यांची बोट बुडाली होती. नंतरच्या काळात एकदा त्यातले अनेक पुतळे आगीत जळून खाक झाले होते आणि दुस-या महायुद्धात झालेल्या बॉंब हल्यात या प्रदर्शनाची इमारत उध्वस्त झाली होती. अशा प्रकारच्या संकटातून हे प्रदर्शन पुन्हा पुन्हा सावरले. नष्ट होऊन गेलेल्या पुतळ्यांच्या जागी त्यांच्या प्रतिकृती तयार करून उभ्या केल्या गेल्या आणि त्यांत नवी भर पडत राहिली.मादाम तुसाँ यांचे संग्रहालय हे लंडन शहराचे एक प्रमुख आकर्षण आहे. याची ‘अनुपम’, ‘अद्वितीय’ यासारखी विशेषणेसुद्धा त्याचे वर्णन करायला अपुरी पडतात.
येथील बहुतेक सर्व पुतळे मानवी आहेत आणि पूर्णाकृती आहेत. रस्त्यांमधल्य़ा चौकात उभे केले जाणारे पुतळे आकाराने जास्तच भव्य असतात तर घरात ठेवल्या जाणा-या प्रतिमा लहान असतात. या प्रदर्शनातले पुतळे मात्र अत्यंत प्रमाणबद्ध आणि बरोबर आकाराचे आहेत. त्यामुळे ती खरोखरची माणसेच वाटतात.
दगड किंवा धातूंना आकार देण्यासाठी जितके परिश्रम करावे लागतात त्या मानाने मऊ मेणाला हवा तसा आकार देणे सोपे असेल, पण त्यावर हुबेहूब माणसाच्या त्वचेसारख्या रंगछटा चढवणे, चेहे-यावर भाव आणणे वगैरे गोष्टी करतांना सगळे कौशल्य कसाला लागत असेल. ते करणा-या कारागीरांना विशेष प्रसिद्धीसुद्धा मिळत नाही. या प्रदर्शनात ठेवले गेलेले पुतळे फक्त त्या माणसाचे दर्शन घडवीत नाहीत. त्याची वेषभूषा, केशभूषा, त्याच्या अंगावरले अलंकार इत्यादी प्रत्येक गोष्ट अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह सादर केलेली असते. ते पुतळे असले तरी नुसतेच ‘अटेन्शन’च्या पोजमध्ये ‘स्टॅच्यू’ झालेले नसतात. रोजच्या जीवनातल्या सहजसुंदर असा वेगवेगळ्या मुद्रांमध्ये ते उभे केले आहेत.
प्रदर्शनात अनेक दालने आहेत. कोठे ऐतिहासिक व्यक्ती आहेत. आठव्या हेन्रीसारखे जुन्या काळातील राजे आहेत तर चर्चिल व हिटलरसारख्या मागल्या शतकातील प्रसिद्ध लोक आहेत. आजच्या राणीसाहेबा त्यांचे पतिदेव व मुलेबाळे, लेकीसुनांसह या जागी उपस्थित आहेत. कुठे जगप्रसिद्ध नटनट्या आहेत तर कुठे खेळातल्या छानशा पोजमध्ये खेळाडू उभे आहेत. मादाम तुसादच्या संग्रहालयात पुतळा असणे हाच आजकाल प्रसिद्धीचा मानदंड झाला आहे. या सर्व दालनांत फोटो काढायला पूर्ण मुभा आहे.
या प्रदर्शनात जशा प्रसिद्ध व्यक्ती आहेत तसेच सर्वसामान्य लोकांचे पुतळेसुद्धा मोठ्या संख्येने या पुतळ्यांच्या गर्दीत दिसतात. ते पुतळे इतक्या खुबीने ठेवले असतात आणि सारखे इकडून तिकडे हलवले जात असतात की ते पुतळे आहेत की ती खरीच माणसे आहेत असा संभ्रम निर्माण होतो. एखाद्या बाकड्यावर कोणी म्हातारा पेपर वाचत बसला आहे, हांतात कॅमेरा धरून कोणी फोटो काढत उभा आहे अशा प्रकारचे हे पुतळे आहेत.
कांही खास दालनांमध्ये विविध प्रकारची दृष्ये उभी केली आहेत. त्यात चांगलीही आहेत आणि बीभत्स देखील आहेत. भयप्रद तसेच फक्त प्रौढासाठी राखीव विभाग आहेत. प्रसिद्ध घनघोर युद्धप्रसंग, भयानक दरोडेखोरांचा हल्ला, तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणा-या शारीरिक यमयातना वगैरेची भीतीदायक चित्रे आपण अंधारातून पुढे जात असतांना अचानक दत्त म्हणून समोर उभी राहतात आणि आपली गाळण उडवतात. त्यासोबत कानठळ्या बसवणारे संगीताचे सूर असतातच. ते वातावरण अधिकच भयाण बनवतात.
मादाम तुसाँ संग्रहालयाच्या शाखा लंडनसह सिंगापूर, हाँगकाँग आणि बँकॉक एमएटर्डम , लासवेगास, कोपेनहेगन, बर्लिन, वॉशींटन डी.सी. व न्यूयार्क येथे आहेत आहेत. लंडन येथील दोनशे वर्षे मादाम तुसाँ यांचे जुने संग्रहालय सुद्धा सतत बदलत असते, त्यात भर पडत असते. अशा प्रकारे ते अगदी अद्ययावत ठेवले गेले आहे.
मादाम तुसाँ यांचे १६ एप्रिल १८५० रोजी निधन झाले.
Comments
Post a Comment