खुसरो ते करंदीकर via न्यूटन

"छाप तिलक सब छिनी रे मोसे नैना मिलाईके " लिहणारा आमिर खुसरो आणि "रूप पाहता लोचनी सुख जाले वो साजणी" लिहणारे संत ज्ञानेश्वर हे समकालीन होते हे लक्षात आलं की मला भारी वाटतं. दोघांचं आयुष्य वेगळं, अनुभव वेगळे आणि दोघांच्या लिखाणाची जातकुळी सुद्धा वेगळी आहे. 
पण दोघांचं साहित्य कालातीत आहे. 

 21 व्या शतकात कुठेतरी एका मशीनच्या code सोबत दिवसा झुंजणारी पोरगी संध्याकाळी उदरभरण करता करता ह्या दोघांना ऐकू शकते... ऐकता ऐकता "व्वा काय भारी लिहलंय" अशी आपसूक मनभरून दाद देऊ शकते याचा अर्थ असा आहे की बाराव्या शतकातल्या माणसांनी जे लिहून ठेवलं ते अजूनही... अ-जू-न-ही तुमच्या भावनांशी कुठेतरी relate करतं. आणि हे लक्षात येणं हा एक रोमांचक अनुभव आहे.

अजून एक - जेव्हा शिवाजी महाराज सतराव्या शतकात ईकडे स्वराज्य स्थापनेसाठी लढत होते तेव्हा त्याच वेळी तिकडे युरोपात न्यूटन गुरुत्वाकर्षणाच्या शोधासाठी झटत होता! 

भूतकाळातील दोन माणसांनी एकाच वेळी अस्तित्वात असूनही, त्यांचा त्या काळावर खूप मोठा प्रभाव असूनही त्यांना एकमेकांबद्दल काहीच माहित नसणं ही किती मोठी शोकांतिका आहे! आजच्या घडीला जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातल्या 2 प्रभावशाली माणसांना एकमेकांच्या अस्तित्वाचा मागमूसही नसावा ही शक्यताच नाहिये. 

कदाचित् विंदा करंदीकरांनी हाच same thought घेऊन "तुकारामांच्या भेटीला शेक्सपियर आला " लिहिली असावी.
आता चेक केलं तेव्हा लक्षात आलं की संत तुकाराम आणि शेक्सपियर यांचाही जिवनकाळ overlapping आहे. 
म्हणजे मला जे आज वाटलं आहे ते विंदांना काही वर्षांपूर्वी तस्संच्या तसं वाटून गेलं आहे. आणि हे लक्षात येऊन मनाला उगाचच काहीतरी छान वाटून गेलं आहे.

(Photo- Shakespeare's Globe Theater)

Comments

Popular Posts