स्वप्नं

बालपणी म्हणजे साधारण 12-14 वयापर्यंत उन्हाळ्याच्या सुट्ट्या नामक एक भारी प्रकार आयुष्यात असायचा. आधीच मे महिना, त्यात जळगावसारख्या रुक्ष प्रदेशातलं ऊन त्यात पाणी नाही,लाइट नाही असे सगळे ते दिवस. आम्हा लहान पोरा टोरांनी आसुसुन वाट पहावी असा नात्या गोत्यात नसणारा एकमेव माणूस म्हणजे बर्फाचा गोळा विकणारा ..
रणरणत्या उन्हात दुपारच्या वेळी तो अचानक उगवायचा आणि 2 रुपयाच्या बदल्यात हातात मुठीएवढ्या आकाराचा रंगबेरंगी  बर्फाचा गोळा देऊन जायचा.  जेव्हा आपल्याच घरात पाणी नाही तिथे हा पारगावचा माणूस पाणी आणि बर्फ कुठून आणत असेल , त्याच्याकडच्या रंगात केमिकल किती आणि जीवजंतू किती असले क्षुद्र विचार मनाला शिवण्याइतपत आम्ही मोठे झालेलो नव्हतो. उन्हाळ्यात माझ्या गावासारख्या लहानशा खेडेगावात तो बर्फाचा गोळा मिळणे हा आयुष्यातला अपूर्व आनंद होता. 
आपण सगळ्यांनी आयुष्यात शेवटच्यांदा बर्फाचा गोळा कधीतरी खाल्लाच असेल. त्या दिवशी हे माहीतही नसेल की यानंतर हा आनंद पुन्हा आयुष्यात येणे नाही. बर्‍याच चांगल्या गोष्टी अशा शेवटच्या कधी संपतात हे आपल्याला कळातसुद्धा नाही. गाभुळलेली चिंच शेवटची कधी खाल्ली होती? चित्रकलेच्या पेपर नंतर शेवटचं चित्र आपण कधी रंगवलं? शेवटच्यांदा पाण्यात पोहून किती वर्षं उलटली? मैत्रिणीने ब्लॉक केल्या पूर्वी शेवटचं कधी बोललो होतो आपण? असे कित्येक निरोपाचे क्षण हे "निरोपाचे" आहेत हे माहितच नसताना नियती हातातून नकळत असं किती काही काढून घेते. त्याने फारसा फरक पडतोच असंही नाही तरी हे क्षण शेवटचे आहेत हे माहीत असतं तर आपण जरा जास्त रेंगाळून निरोप दिला असता का?

हे सगळंचं सगळं स्क्रिप्ट मी आज स्वप्नात पाहिलं. आजकाल जळली मेली स्वप्नं सुद्धा भितीदायकच पडतात. दचकून जाग यावी अशी. यापुर्वीचं शेवटचं चांगलं स्वप्न कधी पडलं ते आठवत सुद्धा नाही. आज पडलं होतं हे लक्षात रहावं म्हणुन ही नोंद. (27/08/2023 9.45am)

Comments

Popular Posts