भेदाभेद अमंगळ वगैरे वगैरे

त्याचं झालं असं - कुणा लेखकाने स्वतःला जातीपातीच्या भेदभावाबद्दलचे आलेले अनुभव  फेसबुकवर पोस्ट केले होते. माझ्या एका भल्या मित्राने लगोलग त्या पोस्टचा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हाट्सअपला ती पोस्ट पाठवली आणि त्याखाली लिहिलं की "सदर लेखक बघ कसा धांदात खोटे बोलतोय ते. मला तर गेल्या वीसेक वर्षंत असले जातीविषयक अनुभव कधीच आले नाहीत. इनफॅक्ट माझ्या कुठल्याच मित्राला असे जातीवरून भेदभाव केल्याचे अनुभव कधीच आले नाहीत"

मला मेसेज आला तेव्हा तेव्हा मी ऑफिस मध्ये काम करत होते.  खरं तर हे म्हणजे "माझ्या घरी नळाला भर उन्हाळ्यातदेखील दोन वेळ पाणी येतं म्हणून जगात कुठेच पाण्याची कमतरता किंवा दुष्काळ नाही असं समजण्याइतपत बावळट वाक्य आहे"  असं त्याला उत्तर द्यायची खुमखुमी दाटून आली होती पण विषय लांबण्यापेक्षा आपण फक्त आपल्यापुरतंच बोलूया म्हणून म्हटलं - की मला काहीवेळा लोकांनी आडून आडून तर काहीवेळा थेट जात विचारलेली आहे आणि मी लोकांना इतरांची जात विचारताना किंवा इतर लोकांना जातीवरून त्यांच्या पाठीमागे टोमणे देताना ऐकलेलं आहे. त्यामुळे मी तुझ्याशी सहमत नाही. 

त्यावर त्याने दीर्घ उसासे वगैरे टाकले. मीही laptop मधे परत नाक खुपसलं. आमच्या संभाषणापुरता विषय संपला होता पण खरं तर डोक्यातून विषय अजून पर्यंत गेलेला नाही. 

मला स्वतःला "तुम्ही कोण नक्की?" किंवा "तुम्ही म्हणजे अमुकतमुक आहात का?" या पलीकडे जातीवरून हिणवले जाण्याचे अनुभव नाहीत. पण इतरांना कळत नकळत त्यांच्या जातीवरून टोमणे मारणारे लोकं मी आजुबाजुला पाहिले आहेत. उदाहरणार्थ collage होस्टेल ला एक उत्तर भारतीय मुलगी होती. मैत्रीणच. ती तथाकथित उच्चजातीय होती आणि तिचं इतरांसोबत छोट्यामोठ्या कारणांवरून बिनसलं किंवा छोट्यामोठ्या कारणांमुळे बोलाचाली झाली की ती सर्रास त्या त्या व्यक्तीला उद्देशून "कोई तमीज ही नहीं है उसे बात करनेकी. ये जो डोम-चमार लोग होते है ना, उनके जैसे behave करते है ये लोग. गांव से पहली बार बाहर आए हो तो थोडा adjust करना सिखना चाहिए ना. छोटा mentality है ना इनका, इसलीए ऐसी हरकते करते है ये लोग..." वगैरे वगैरे आमच्याजवळ बरळत असे. 
मी पहिल्यांदा जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिला "डोम चमार" म्हणजे काय असतं हे विचारल्याचं मला अजून आठवतं. त्यावर तिनं जे सांगितलं ते ऐकून मी तिला" तू ऐसी गाली मत दे यार... " म्हणून टोकल्याचंही. 
"अरे बाबा ये गाली नही है... ये तो caste है उनका. गाली थोडी ना दे रही हूं" वगैरे तिनं म्हटल्याचंही मला स्मरणात आहे. तीला दरवेळी टोकून टोकून मी तिची तसं बोलायची सवय बरीचशी कमी केली होती. नंतरचं मला माहीत नाही. 

College ला  दरवर्षी fees भरण्याच्या काळात reserved category मधून अत्यंत कमी खर्चात प्रवेश घेतलेल्या पोरांबद्दल राग करणारा, OpenCategory  मधून प्रवेश घेतलेला एखादातरी जीव असायचाच. तोही राग व्यक्त करताना आजूबाजूला कोण आहे हे बघूनच बोलायचा. हीसुद्धा एक बारिकशी नोंद डोक्यात आहे. 

"एका ओळखीतल्या, गरीब आणि दलीत व्यक्तीच्या घरी तो आजारी आहे म्हणून त्याला पाहायला गेलो, तेव्हा त्याच्या बायकोनं दिलेला चहा प्यावासा वाटत नव्हता... 'या लोकांच्या' घरी स्वच्छता नसते म्हणून तिथे खायला प्यायला कसंसंच वाटतं " हे असं दोन बायकांमधलं संभाषण मी शाळकरी वयाची असताना ऐकलेलं आहे. ते आजारी पडलेल्या व्यक्तीचं कुटुंब आणि या बायकांचं कुटुंबं यांची शेजारपणामुळे बऱ्यापैकी ओळखदेख होती. दोन्ही कुटुंबांतली पोरं माझी समवयस्क. पण हे त्यांच्या पाठीमागे असं काही बोललेलं ऐकायची माझी पहिलीच वेळ असावी. म्हणून तो प्रसंग लक्षात आहे कदाचित. 

फार कमी अनुभव आहेत असे खरंतर. पण मला वैयक्तिक असे अनुभव नाहीत म्हणून 'जातीपातीचे भेद आताच्या काळात कुणी मानत नसेल' असं मला वाटत नाही. 

माझ्या मित्राने "मला असे अनुभव आले नाहीत" असं म्हटलं असतं तर मला चाललं असतं पण "मला असे अनुभव आले नाहीत म्हणून दुसर्‍या लोकांना आलेले अनुभव चुकीचे ठरवून - ते ठार खोटं बोलतायत" असा निकाल देऊन टाकणं हे काही मला बरोबर वाटलं नाही

साधारणत: आपण केंद्रबिंदू आहोत आणि आपण आखू त्या त्रिज्येत आपला भवताल जगतो असं समजणं आणि त्यावरुन समाजाला जज करणं भाबडेपणाचं आहे. कळत नकळत आपणही असं समजत असूच. पण माझ्या आसपासचं जग सहिष्णू आहे आणि लोक उगंच कांगावा करतात असं कुणी म्हटलं की असं बरंच काहीबाही वाईटसाईट आठवत राहतं मग...

या आणि अशा अनेकच बाबतीत पूर्वी तावातावाने वाद घालणं, स्वतःची खिंड लढवत बसणं मला आवडायचं. आताशा असं वाद घालत बसणं नको वाटतं. असे बारीकसारीक विषयही सोडून द्यायला हवेत खरं तर पण काही किडे बराच काळ वळवळत राहतात डोक्यात.... उगीचच...

Comments

Popular Posts