या वर्षातलं हे तिसरं (च) पुस्तक.

कुमार वयापर्यंत अक्षरशः ढिगाने पुस्तकं वाचली. जी मिळतील ती कुठलीही. आता तसं होत नाही. पुस्तकांच्या बाबतीत खूप म्हणजे खूपच चॉईस आला. त्यात मराठी पुस्तकं तर निम्मी अर्धी Relatable च वाटत नाहीत.

बालपणी घरी केबल किंवा चॅनल नावाचा प्रकार नव्हता. दूरदर्शन चे प्रोग्राम्स हाच काय तो करमणुकीचा ऑप्शन होता त्यामुळे पुस्तकं वाचायला करमणूक हे देखील एक कारण असायचं. शिवाय घरात बाकीही सगळे लोक पुस्तकं वाचायचे त्यामुळे खूप वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं घरातच उपलब्ध होती. उरला उरला विषय शाळेच्या आणि गावातल्या सार्वजनिक ग्रंथालयानं सोडवला होता. त्यामुळे शाळेत समवयस्क पोरी जेव्हा टीव्ही सिरियल मधल्या नायक नायिकांची लफडी आणि सासू सुनांच्या चुगल्या दुपारच्या सुट्टीत discuss करत असत तेव्हा एकटे न पडू देण्याचा जिम्मा पुस्तकांचाच असे. पुस्तकं वाचून आम्ही फार यशाचे झेंडे गाडले आणि सिरियल पाहून लोक वाया गेले असं मला मुळीच म्हणायचं नाहिये. तसं नसतं सुद्धा. पण आजही दोन्ही options दिले तर मला पुस्तकांचीच choice better वाटेल. 

सभोवतालच्या नकोशा चर्चांमधून आणि कंटाळवाण्या कामातून पुस्तकांनी मला सुट्टी दिली. माझ्या नुकत्याच फुलू लागलेल्या जाणीवांना एक आगळं उबदार असं अस्तर दिलं. गप्पा मारायला किंवा कंटाळा घालवायचा म्हणुन सतत कुणीतरी सोबत लागणारं परावलंबित्व पुस्तकांमुळे माझ्या वाट्याला येऊ शकलं नाही. पुस्तक वाचताना तासनतास चालणारी समाधी ही काय असते हे ते तसं पुस्तक वाचलेला माणूसच समजू शकतो. मुळातच एकलकोंड्या स्वभावाला पुस्तकांनी अजून हवा दिली. जी अजूनसुद्धा बर्‍यापैकी टिकून आहे. चांगलं की वाईट या बाबत मी ठोस काही आजही ठरवू शकत नाही.

आज तशी तंद्री लावून काहीही वाचणं गेल्या कित्येक वर्षांत झालेलं नाही. त्याला वयानुसार बदलत जाणारं आकलन जबाबदार आहेच. पण मुळात काल सुसंगत असं लिहणारे लोकही कमी आहेत हेही आहेच. पुस्तकांच्या दुनियेतला त्या उबदार एकाकीपणाची उणीव या दशकात OTT आणि YouTube ने भरून काढली. 

Comments

Popular Posts