सटवाईचे योग

आयुष्यात लोकं येतात आणि जातात. जन्मासोबत येणाऱ्या नात्यांची गुंतावळ सोडली तर तुमच्या भोवतालच्या वर्तुळातली लोकं सतत बदलत असतात. अशा सततच्या बदलत्या वर्तुळात कुणीतरी आपल्या फ्रिक्वेन्सी वरचा व्यक्ती सापडणं हा दुर्लभ योगायोग असतो. सगळ्यांच्या नशिबी सटवाई हा योग लिहून जात नाही. त्याला पूर्व पुण्याई हवी.

अश्या व्यक्तीशी भेटण्याचा बोलण्याचा त्याच्या अवतीभोवती आयुष्य वेढून टाकण्याचा एक बेधुंद काळाचा तुकडा असतो. त्यानंतर ती व्यक्ती आयुष्यातून नाहीशी होण्याची जाणीव वेळोवेळी झटकून टाकायला मन हातभार लावतं. त्यावेळी आकाशात पूर्ण चंद्र असतो. शेवरीच्या फुलाहून मऊ कूस असते . भर कडाक्याच्या उन्हात सुद्धा हवा गंधाळलेली भासू शकते. Everything is temporary सारखी वाक्यं माहीत असूनसुद्धा चालू गाढवपणा आपल्याला मंजूर असतो. 
And by knowing everything... You still choose to cherish your time! 

त्या त्या वेळे नंतर ती ती माणसं जातात. त्यांच्या असण्या नसण्या च्या बर्‍या वाईट खुणा मनावर सोडून जातात. त्या ताटातूटी नंतरचा काळ हा भयानक मानसिक कुतरओढीचा काळ असतो. त्या काळात तुम्ही तगून राहिलात तर तुम्ही ते युद्ध जिंकलं असं समजा. कारण त्या प्रचंड ओढाताणी नंतर मन दमून श्रांत होतं. जो जिथं आहे तिथे, जसा आहे तसा त्याला जगू द्यायला राजी होतं. 

अश्या निर्मम अवस्थेत मग तुम्ही तुम्हालाच नव्याने सापडत जाता. बर्‍या वाईटा पैकी बर्‍या आठवणीच तेवढ्या निवडून त्यात हवा तितका वेळ डुंबून राहू शकता. त्या फसव्या आणि मधाळ आठवणींच हसू अंगभर पसरत जातं. That's your guilty pleasure!

जगाला त्याची खबरबात असायचं काही कारण नसतं. कोणाला काही कळलं तरी तुम्हाला त्याचं सोयरसुतक नसतं. आणि मग तुमचा नूर पालटतो. तुमच्या आयुष्यात अचानक नवे, वेगळे रंग भरू लागतात. जो गेलाय त्याच्याबद्दल तुम्हाला काहीही वाटेनासं होतं. मनाला पुन्हा हलकेपणा येतो. नव्या अनुभवांसाठी मन पुन्हा सुपीक जमीन तयार करतं. आयुष्य रटाळ वगैरे वाटण्याचे दिवस सरतात. बुद्धिला आव्हानात्मक असं काही आयुष्यात शोधावंस वाटतं. नवीन अनुभव घ्यावेसे वाटतात. पुन्हा एक लढाई हरण्यासाठी आपण तयार असतो. 

एक संथ आणि रटाळ दिवस अचानक पालटून हवाहवासा कसा होऊ शकतो हे कळायला या सगळ्यातून जावं लागतं. आणि त्यासाठी पूर्व पुण्याई लागते. कारण सटवाई 
सर्वांच्या नशिबी हा योग लिहून जात नाही.. 

Comments

Popular Posts