मी, बाबा आणि शकीरा

2010 चा फिफा वर्ल्ड कप दोन गोष्टींमुळे गाजला: त्यातली पहिली म्हणजे पाॅल ऑक्टोपस आणि दुसरी म्हणजे शकीरा. पाॅलने मॅचचं भविष्य सांगून सांगून बुकींच्या पोटात गोळा आणला आणि शकीराने वाका वाका करून अखंड जगताला वाकायला आय मीन नाचायला लावलं. 

इंटरनेट वगैरे फारसं त्याकाळी कुणी वापरत नव्हतंच आणि घरात फक्त दूरदर्शन. इतर कुठलेही चॅनल्स नाहीत. त्यामुळे हे गाणं ऐकायला आम्हाला दूरदर्शन वरच अवलंबून राहावे लागत असे आणि दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये शेवटची पाच-सात मिनिटं खेळाच्या बातम्यांसाठी राखून ठेवलेली असत. तर त्यावेळेस फिफा वर्ल्ड कप च्या काळात खेळाच्या बातम्या देण्याच्या अगोदर हे 'वाका वाका' चं म्युझिक लागायचं. पूर्ण गाणं ते वाजवत नसत. फारतर तीसेक सेकंदांसाठी ते गाणं वाजत असेल पण ते गाणं ऐकायला मी आणि अपू दोघेही जिथे आहोत तिथून धावत येऊन हॉलमध्ये टीव्हीसमोर जाऊन बसत असू. 

फिफा च्याच काळात एक दिवशी माझं आणि बाबांचं काहीतरी बिनसलं. थोडीशी बोलाचाली झाली असेल कदाचित, कशावरून ते आठवत नाही. पण त्यामुळे मी तोंड फुगवून बसले आणि असहकाराचं धोरण अवलंबलं. ते बोलतील तेवढंच बोलायचं. ते विचारतील तितक्याच प्रश्नांना (शक्यतो एका शब्दात) उत्तर द्यायचं. स्वतःहून  काहीही बोलायचं नाही. राग म्हणजे राग. दोन दिवस हे अबोलासत्र चाललं. बाबांनाही कळून चुकलं होतं की बाईसाहेब फुगून बसल्या आहेत पण स्वतःहून त्याबद्दल बोलतील ते बाबा कसले. एक दिवशी दुपारच्या वेळेला ते कॉलेजमधून परत आले आणि त्यांच्या नोकियाच्या मोबाईल मध्ये कुठूनतरी त्यांनी वाका वाका गाणं डाऊनलोड करून आणलं होतं. ते घरात आले आणि त्यांनी फक्त ते गाणं सुरू करून मोबाईल मोबाईल खिशात ठेवून दिला आणि ते त्यांची त्यांची कामं करु लागले. मी कोणत्यातरी पुस्तकात मान खुपसून बसले होते. ते गाणं वाजता बरोबर आमचे कान टवकारले आणि दोन-एक मिनिटं बोलू की नको बोलू करत शेवटी गेला अपमान बोंबलत म्हणून सगळा रुसवा-फुगवा सोडून मी बाबांच्या मागोमाग चालत गेले आणि मोबाईल मागून घेतला. कुठून आणलं गाणं, कुठे आहे, कसं लावायचं वगैरे सविस्तर चौकशी झालीच. आमच्या अबोल्याचा बांध फुटला आणि हेच गाणं दिवसभर वाजवून मी आणि अपूने घरच्यांच्या कानांना वात आणला. 

दुसर्‍या दिवशी दुपारी जेवणाच्या टेबलवर पण तेच गाणं. वैतागून आई बोलली- "काय तुम्ही दोघे सारखं सारखं तेच गाणं ऐकत बसता. वाका वाका च्या पुढे मागे ती काय बोलते काय कळतं तरी का तुम्हाला? कशी छान हिंदी, मराठी गाणी ऐकावीत. किती सुंदर शब्द असतात. किती अर्थपूर्ण गाणी असतात. किती छान वाटतं जुनी गाणी ऐकल्यावर. हे काय लावून बसला आहात वगैरे वगैरे..... 
तेव्हा मी आईला म्हटलं: अगं हे गाणं नाहीये. हे फक्त संगीत आहे आणि संगीताला शब्द नसतात. ते फक्त ऐकायचं असतं. एन्जॉय करायचं असतं (नको तिथं असा शहाजोगपणा शिकवायची मला तेव्हापासून सवय होती म्हणजे 😁😁) 

यावर आई गप्प बसली आणि बाबा होकारार्थी मान डोलावत हळूच गालात हसले. 

मला म्हणाले:  तुला जे. कृष्णमूर्ती माहित आहेत का? 
मी:  हो. नाव ऐकून आहे. 
बाबा:  कोण आहेत ते? 
मी: विचारवंत आहेत. लोकसत्ताला त्यांच्यावरती एक कॉलम सुद्धा येतो. 
बाबा: तू तो काॅलम वाचतेस का? 
मी: नेहमी नाही. पण अधून-मधून वाचते. का काय झालं?
बाबा म्हणाले : तू मोठी झालीस की तुझं नाव आपण जे. क्रांतीक्रुंती ठेवूया.... तत्वज्ञान चांगलं शिकवतेस तू. 😂😂😂😂😂

(यावर घरातल्या उर्वरित दोघांनी बत्तीशी दाखवून अनुमोदन दिलं हे वेगळं सांगायला नकोच 🙈)

Comments

Popular Posts