सचिन kundalkar
फायनली सचिन कुंडलकर याचं 'नाइन्टीन नाइन्टी' वाचून झालं. फार फार तर दोन दिवसात संपेल असं पुस्तक मला महिनाभर पुरलं. वेळ मिळत नसल्याने म्हणा किंवा इतर कामांमुळे म्हणा शेवटचे तीन-चार लेख राहिलेले. ते या वीकेंडला वाचून संपले आणि इतके दिवस ते पेंडिंग ठेवले होते हे एका दृष्टीने बरंच झालं असं वाटू लागलं. 'फॅन्टसी' , 'प्रकरण' आणि 'नैराश्याची सुबक नोंदवही' हे तीन लेख.
कथा कादंबऱ्यांमधून मन केव्हाच उडून गेलंय खरंतर. हल्ली पुस्तकं स्वतः विकत आणून वाचणंही वरचेवर होईनासं झालंय. कुंडलकर तसा ब्लॉग मधून आणि वर्तमानपत्रांच्या कॉलम मधून भेटत होता अधून मधून. काहीतरी अपिल होईलसं लिहतो असं वाटायचं म्हणून पुस्तकातून वाचून पाहू म्हटलं आणि हायसं वाटलं. म्हणजे साधारणतः पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या माणसाला त्याच्यासारखाच गटांगळ्या खाणारा दुसरा माणूस दिसला की कसं वाटेल तसं... कुंडलकर प्रवासाविषयी लिहतो.आवडीनिवडींविषयी, भावभावनांविषयी, नैराश्याविषयी लिहतो आणि कुठल्यातरी क्षणी click होतं की कथा कादंबर्यातून आपला जीव का उडाला असावा ते. कारण मराठी अभिजात वगैरे साहित्यातल्या बऱ्याच गोष्टी आता आपल्या काळाशी irrelevant झालेल्या आहेत. अठराविश्वे दारिद्र्य, दुष्काळी गावं, नोकरीसाठी भटकणारा नायक, प्रेमात झुरणारी नायिका, गावशिवाराचं राजकारण, इतिहासातली युद्धं इ. इ. विषय आपल्या जगण्याशी मेळ खात नाहीत. किंबहुना आपण तिथून कधी आणि किती वेगानं पुढे निघून आलो ते आपल्याही ध्यानी आलेलं नाही. आणि म्हणूनच त्यावरुन जीव उडाला असावा कदाचित.
एकुणातच आजच्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी, पिढीशी, नातेसंबंधांशी आणि भवतालाशी जुळवून घ्यायला कुंडलकरला जमलं आहे असं वाटतं. कारण बव्हंशी त्यानं जे लिहिलंय ते वाचताना अधनंमधनं "अरेच्या! आपल्यालाही असंच वाटतंय की" असं जाणवू लागतं... वैयक्तिक लिहितो. काहींना आत्मकेंद्री वाटेल पण तरी प्रचंड रीलेटेबल वाटत राहतो. लोक त्याला काही म्हणो. मीही कदाचित उद्या वेगळं काही म्हणेन. पण नाइन्टीन नाइन्टी आवडलं आपल्याला.
माणसांच्या गराड्यात सुद्धा एकेकटी असणारी, लिहिणारी- वाचणारी आणि जगरहाटीची इतर सगळी कामं पार पाडत असताना स्वतःच्या भाव-भावनांवर स्वतःच विचार करणारी, बदल स्विकारण्यासाठी धडपडणारी आणि पुन्हा उठून उभं राहणारी माणसं आजूबाजूला दिसतात. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद नसला तरी काहीतरी बंध जोडून असल्यासारखं वाटतं. आश्वस्त वाटतं. माझ्यासाठी कुंडलकर अशा माणसांच्या वर्तुळात अगदी सहज जाऊन बसला आहे. इतरांनी आपापली मतं बनवायला माझी काही हरकत नाहीये ...
टीप - भावभावनांबद्दल फक्त सॉक्रेटिस-ऍरिस्टॉटल-प्लेटो वगैरे प्रभ्रृतींपासून गेलाबाजार श्रीश्री किंवा नित्यानंद (via कबीर, ओशो इ. इ.) थोर्थोर विभूतींनीच काय ते बोलावे. बाकीच्यांनी काही मांडूच नये असा समज असलेल्यांनी कुंडलकरच्या नादी लागू नये.
असला काही फिल्टर नसलेल्यांनी जमल्यास वाचावं आणि आपापली बरीवाईट मतं बनवावीत.
Online मिळालेल्या दोन लेखांची लिंक खाली देतेय. बाकी वाचण्यासारखं ब्लॉग वर आहेच.
प्रकरण
https://www.maayboli.com/node/54017
नैराश्याची सुबक नोंदवही भाग एक आणि दोन
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/karant-news/articles-in-marathi-on-loneliness-1552123/lite/
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/karant-news/articles-in-marathi-on-depression-1556613/lite/
Comments
Post a Comment