ग्रामीण vs शहरी टीवटीव

गावाकडे कुठल्यातरी वाईट घडामोडी घडल्या की शहरी लोकांना त्याबद्दल जबाबदार धरणं किंवा शहरी लोकांचा योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे गावाकडच्यांनी त्यांना बेजबाबदार ठरवणं नित्याची बाब आहे आहे. 

खरं तर यात चुकी कुणाचीच नाही. दोन्हीकडच्या लोकांनी एकमेकांना गृहीत धरणं बालिशपणा आहे असं माझ्यासारख्या ना धड ग्रामीण ना धड शहरी व्यक्तीला वाटतं

ग्रामीण भागात जन्म झाल्यामुळे माझा गावकुसाशी फार जवळचा संबंध आला. त्यामुळे मूलभूत गरजांची उणीव असणे म्हणजे काय हे जवळून पाहिलं. उदाहरणार्थ घरात वीज नसणे, गावात बस नसणे, रस्ता नसणे, बस पकडण्यासाठी घरापासून दोन तीन किलोमीटर पायी उन्हातानात चालत जावे लागणे, गरीबी असणे, खाण्यापिण्याची दोन वेळेची हातातोंडाशी गाठ असणे, शिक्षण न मिळणे, मिळत असेल तर त्याला दर्जा नसणे, शिक्षणासाठी पायपीट करावी लागणे, भूक भागवण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागणे, स्वतः व्यवस्थित घर नसणे, चप्पल-कपडे- दैनंदिन गरजेच्या वस्तू नसणे अशी ही खूप मोठी यादी करता येईल. नशिबाने सुखवस्तू घरात जन्माला आल्याने यातलं काहीच भोगावं लागलं नाही. पण गावकुसात आत-बाहेर या आणि यासारख्या अनेक गरजांशी नित्यनेमाने झगडणारी माणसं खूप पाहिली. 

शहरात आलो तेव्हा कळलं की पायाला माती चिखल न लागलेली आपल्या एवढीच एक पिढी इथं नांदते आहे. 
तिला वीज जाणं म्हणजे नक्की काय काय गैरसोय होते ते ठाऊकच नाही. शेत कसं असतं आणि पिकांचे जीवनचक्र काय असतं तेही ठाऊक नाही. गरिबी आणि भूकेसाठी लाचार होऊन जगणं - ढोर मेहनत करणं हे फक्त त्यांनी सिनेमातून पाहिलं आहे. बस साठी, प्रवासासाठी - शिक्षणासाठी उन्हातानात दोन-तीन किलोमीटर पायपीट करणे हा त्यांच्यासाठी जुन्या काळातला कॉन्सेप्ट आहे. एकविसाव्या शतकात, त्यांच्याच पॅरलल काळात दूरवर कुठेतरी हे सगळे चाललंय चाललंय हे त्यांच्या गावीही नाही आणि म्हणूनच ही पिढी तुमच्या गैरसोयीबद्दल निव्वळ चक् चक् करत फार फार तर उपहासाचे निश्वास सोडू शकते. ती तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्सना सहानुभूती देऊ शकत नाही. 

त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. पैसा आहे आणि तो कुठे साठवावा ही त्यांची समस्या आहे. USA ला ॲडमिशन होत नाही- कॅनडाला जावं की जाऊ नये ही समस्या आहे. ट्राफिक ही समस्या आहे. वेळ हाताशी नसणं ही समस्या आहे. खंडीभर माणसं सतत ऑनलाइन टीवटीवत असताना तुमच्या प्रॉब्लेम मध्ये तुमच्याशी समजून घेणारं कुणी नसणं ही समस्या आहे. आणि या दोन वेगवेगळ्या वर्गातल्या समस्यांतली दरी एवढी मोठी आहे की ती सांधता येणे कदाचित तेव्हाच शक्य होईल जेव्हा दोन्ही तीरांवर च्या लोकांना आपापल्या जागेची आदला बदल करता येईल. काही काळासाठी का होईना तेथले प्रॉब्लेम्स अनुभवता येतील. आणि मग कुठे लोक सह- अनुभूतीच्या टप्प्यावर पोहोचतील, एकमेकांबद्दल आस्था बाळगतील. पण असं घडणं ही मात्र फार फार अशक्य गोष्ट आहे...

Comments

Popular Posts